Tuesday, June 17, 2008

"ब्लूमिंगटन-नॉर्मल मधील साठ बालगोपालांनी सादर केले अप्रतिम नाट्यरामायणम्"




सौ सिमा आठवले"ब्लूमिंगटन-नॉर्मल - "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" असे अत्यंत प्राचीन, पौराणिक रामचरित्र येथील छोट्या छोट्या दोस्तांनी सादर करून भल्याभल्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. अत्यंत थाटात, देखणेपणाने आणि परिश्रमपूर्वक पार पडलेले हे महानाट्य पाहून 'ब्लूमिंगटन सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्' चे ६०० हून अधिक प्रेक्षकांनी गच्च भरलेले सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. मध्य-पश्चिम अमेरिकेतील ब्लूमिंगटन-नॉर्मल, इलिनॉय येथे सादर केलेले रामायणावरचे हे नाटक आणि कौन बनेगा रामायण एक्सपर्ट (के.बी.आर्.इ.) च्या स्पर्धा यासाठी गेले तीन महिने पद्धतशीर अथक प्रयत्न केले गेले. पाच ते पंधरा वर्षे वयोगटासाठी आकर्षक स्पर्धा तयार केल्या गेल्या. त्यासाठी आधी सर्व मुलांना रामायण रंजक पद्धतीने शिकविले गेले. नंतर चित्रकला, संगणकावरील ऑन-लाईन परिक्षा, गोष्टीरूप रामायण आणि रामायणातील नैतिक मूल्ये, वैशिष्ट्यपूर्ण आदर्श व्यक्तिरेखा यावर वक्तृत्व, अशा स्पर्धा झाल्या. रविवार दि.८ जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची आखणी आणि संयोजन 'हिन्दू स्वयंसेवक संघा'ला साजेसे असे शिस्तबद्ध होते. 'एच. एस्. एस्.' चे स्वयंसेवक आणि त्यांना मदत करणारे अनेक हितचिंतक आणि साठ बालगोपाल यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम अभूतपूर्व रितीने संपन्न झाला. 'हिंदू स्वयंसेवक संघाचे' उत्तर अमेरिका प्रचारक श्री. सौमित्रजी गोखले कार्यक्रमाला प्रमुख पहुणे म्हणून लाभले होते. श्री. श्रीनारायाण चांडक यांनी स्वागतपर भाषण केले. रामायणातील आदर्श मूल्यांमुळे आपण चांगले नेते होऊ शकतो, आपली सामाजिक जणीव प्रगल्भ होण्यास मदत होते असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. हाजारो वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणाचे आजच्या जीवनात काय महत्व आहे ते अत्यंत सुंदर पद्धतीने सौमित्रजींनी सांगितले. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, जटायू, बिभिषण अशा अनेक व्यक्तिरेखांमधून आपण अनेक वेगवेगळे गुण घेऊ शकतो. राम चरित्र अनेक देशांत नृत्य, नाट्य, शिल्प रुपात सांगितले जाते. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, सैबेरिया आणि रशियातसुद्धा रामायणाचे गोडवे गायले जातात. या विषयावरचा दहा मिनिटांचा माहितीपट आधी दाखविला गेला. 'बाल गोकुलम्' हे लहान मुलांवर हिंदू संस्कार करणारे केंद्र ब्लूमिंग्टनमध्ये चालविले जाते. या विषयावरचा १० मिनिटांचा माहितीपटही येथे दाखविला गेला. प्रार्थना, श्लोक, पौराणिक कथा, भारतीय खेळ असे विविध विषय येथे शिकविले जातात. रामायण महानाट्यात 'बालकांड, विश्वामित्रांच्या आश्रमातील विद्याभ्यास, सीता स्वयंवर, राम वनवास, सीता अपहरण, लंका दहन, सेतू बंधन, राम-रावण युद्धातील अनेक प्रसंग, रामाचे आयोध्येत पुनरागमन आणि शेवटी पट्टाभिषेक असे विविध प्रसंग मुलांनी सादर केले. नेपथ्य, प्रकाशयोजना, दृक-श्राव्य पद्धतीचा वापर, सूत्रसंचालन इ. सर्व सुनियोजित होते. भाग घेतलेल्या सर्व मुलांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. 'के.बी.आर्.इ.' या स्पर्धांची पारितोषिकेही टाळ्यांच्या गजरात प्रदान करण्यात आली. अशा तर्हेने पहिल्या प्रवेशापासून टाळ्यांच्या प्रतिसादाने उत्तरोत्तर रंगत गेलेला रामायणाचा हा महानाट्य प्रयोग श्रीरामांच्याच आशीर्वादाने सुफळ संपूर्ण जाहला. "बोलो - श्रीरामचंद्र की जय!!"

No comments: