हिंदुत्वाच्या विजयासाठी भाजपा- सेना युतीत मनसेचा सहभाग असणे ही काळाची गरज - प्रशांत बडवे
सोलापुर - हिंदुत्वाच्या विजयासाठी भाजपा - सेना युतीत मनसेचा सहभाग असणे ही काळाची गरज असल्याचे परखड मत सोलापुर दैनिक तरूण भारत चे संचालक जेष्ठ पत्रकार तथा जेष्ठ समाजसेवक प्रशांत बडवे यांनी यवतमाळ न्युज शी बोलतांना व्यक्त केले. ते म्हणाले युतीसोबत मनसेने येण्यास काहीही हरकत नसावी. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे मुळे खरे नुकसान झाले ते हिंदुत्वाचे. पण मनसे आपल्या जागी बरोबर आहे. कारण प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे हित ठरविण्याचा अधिकार आहे. मनसेनेही तेच केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली ताकद दाखवुन दिली. त्यांनी ताकद दाखवुन दिली नसती तर आज त्यांना कोणीही विचारले नसते हेही तितकेच खरे आहे. बडवे पुढे म्हणाले प्रत्येक जण आपल्या परिने बरोबर असतो पण नुकसान होते ते हिंदुत्वाचे आणि खरे म्हणजे जनतेचे. पण सर्व सामान्य जनता करणार तरी काय?. शरद पवार काँग्रेस मधुन बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली पण निवडणुक आली की ते आजही काँग्रेस सोबत युती करतात पहिली निवडणुक त्यांनी स्वबळावर लढविली होती आणि काँग्रेस सत्तेबाहेर झाली होती. त्यामुळे काँग्रेसला राष्ट्रवादीची ताकद दिसुन आली आणि आता दोघेही एकत्र निवडणुक लढवित आहेत. जर काँग्रेस विचारसरणीचे एकत्र येवू शकतात मग मराठी व हिंदुत्वाचे हित पाहणारे मनसे - सेना एकत्र का येवु शकत नाही याकडे यवतमाळ न्युज ने प्रशांत बडवेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले खरे तर तसेच व्हायला हवे पण उध्दवजींनी आजच मनसेशी युती न करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सेना - मनसे एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. बडवे पुढे म्हणाले की हिंदुत्वासाठी तरी त्यांनी एकत्र यायलाच हवे.