Sunday, April 13, 2008

तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!

रोजगार मंत्रालय : तरुणांना बेरोजगार भत्ता देण्यास केंद्र सरकारचा विरोध"बेरोजगार भत्ता' युवकांमधील आळशीपणाला खतपाणी घालतो आणि युवाशक्तीचा उत्पादक कार्यातील सहभाग कमी होतो. त्यामुळे बेरोजगारांना "भत्ता' देऊ नये, असे केंद्र सरकारचे मत असल्याने त्यासाठीची उपोषणे आणि आंदोलने आता थंडावणार आहेत. दुसरीकडे देशभरातील सुमारे तीन कोटी युवकांचे डोळे रोजगारासाठी सरकारी योजनांकडे लागलेले असताना रोजगार विनिमय केंद्रांतून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी मात्र नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशातील 15 ते 29 वयोगटातील हे युवक योग्य रोजगार संधींची वाट पाहत असून, शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत महाराष्ट्रातील सुमारे तीस लाख युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये नोकरीच्या प्रतीक्षेतील युवकांची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे 46.5 लाख असून, महाराष्ट्रापाठोपाठ केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांत मिळून एकूण सुमारे 50 लाख युवक नोकरीच्या योग्य संधींची वाट पाहत आहेत. राज्यांतील रोजगार विनिमय केंद्रे मात्र बेरोजगारीची ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबर 2007 अखेर देशातील दोन लाख 63 हजार युवकांना या केंद्रांमार्फत खासगी व सार्वजनिक क्षेत्रांत रोजगार मिळाला आहे.बेरोजगारांची शक्ती विकासकामांकडे वळविण्याची गरज व्यक्त होत असतानाच, बालमजुरीची समस्यादेखील समूळ नष्ट करण्यासाठी राज्यांनी पुढाकार घेण्याबाबत केंद्र आग्रही आहे.

हिंदुत्ववाद्यांचा "कोल्हापूर बंद' शांततेत
कोल्हापूर, ता. १३ ः हिंदुत्ववादी संघटनांनी आज पुकारलेला कोल्हापूर बंद शांततेत पार पडला. कारवाई करताना पोलिसांकडून पक्षपातीपणा होत असल्याच्या कारणावरून हा बंद पुकारला होता. आज रामनवमी असल्याने आंदोलनकर्त्यांनीच रिक्षा आणि बस वाहतूक सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे तुरळक प्रमाणात वाहतूक आणि व्यवहार सुरू राहिले. व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद पाळला.

No comments: